किल्ले पावनगड Fort Pavangad (Built by Chhatrapati Shivaji Maharaj)
- शिवप्रसाद शेवाळे
भाग - 1
किल्लासामीप दुसरा पर्वत
किल्ल्यासमुदायीं असूं नये . कदाचित असला तरी सुरंग लावून पाडून गडाचे आहारी
आणावा. सुरुंगास असाध्य असा असला तरी तोहि जागा मोकळी न सोडितां बांधून मजबूत
करावा.
-आज्ञापत्र
गडासमोरील डोंगराच्या आश्रयाने गडावर हल्ला होऊ शकतो त्यामुळे असा डोंगर तोफांच्या माऱ्याने पाडून टाकला जाई परंतू काही डोंगर तोफांच्या आहारी आणणे शक्य नसते. असे डोंगर मोकळे सोडणे हे गडाच्या संरक्षणाच्या दृष्टीने अत्यंत घातक असतात. अशावेळी हे डोंगर बांधकामाने मजबूत करून दुर्गाची निर्मिती केले जाते. असाच पन्हाळ्याच्या समोरील मार्कंडेय नावाचा डोंगर पावनगड म्हणून वसवला गेला. या ब्लॉगमध्ये किल्ले पावनगडाची ओळख करून घेणार आहोत.
किल्ले पावनगड हा गड भोज राजाने बांधला आहे
असे काही अभ्यासकांचे मत आहे परंतू याला कोणताही पुरावा नाही . या बाबत त्यांना
कोणताही ठोस पुरावा मांडता आला नाही. या गडावर शिलाहार काळातील कोणतीही राजसत्तेची
प्रतिक दिसून येत नाही. तसेच शिवपूर्व काळात मार्कंडेय नावाचा डोंगर म्हणून याचा
उल्लेख मिळतो. यावर बांधकाम केलेले शिवपूर्वकाळातील कोणतेही संदर्भ मिळत नाहीत. या
गडाचा पहिला उल्लेख सभासद बखरीमध्ये येतो.
छ. शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या १११ किल्ल्यांच्या यादीत याचा समावेश
आहे . याचा अर्थ हा गड छ. शिवाजी महाराज यांनी बांधला आहे. या बाबत आपल्याला विविध
पत्रातून उल्लेख मिळतात. ३१ जुलै १७१२ चे छत्रपती शिवाजी दुसरे ह्यांनी जोतिषपणाचा
एक निवडा केला आहे. त्या पत्रात ते असे म्हणतात, “ मौजे आंबवडे व मौजे पिंपळे कसबा
सातवे या दोन्ही गावीचे जोतिषपण पुरातन शिवभट तासे याचे आहे. दोही गावचे सिमेस
मार्कंडेय म्हणून डोंगर होता तो थोरले कैलासवासी स्वामीने गड वसऊन पावनगड असे नाव
ठेविले.” या पत्रावरून हा गड शिवाजी महाराज यांनी बांधला आहे याबाबत सबळ पुरावा
मिळतो. आणखी एक ५ ऑक्टोबर १७१६ चे यादव घराण्यातील निवडा पत्र आहे. या पत्रात
पुढील उल्लेख येतो . “त्याउपरी राजश्री शिवाजी राजे छत्रपतीसाहेब याणी पावनगड नवा
वसविला त्याची इमारत बांधावयास अर्जोजी यादव यास व हिरोजी फर्जंद यांस सांगितली.”
यावरून हा गड शिवाजी महाराजांनी बांधला याबाबत कोणतीही शंका राहत नाही. पावनगडाचे
काम मजबूत केले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांनी प्रत्येकी ५ हजार होण अर्जोजी
यादव आणि कोंडाजी फर्जंद यांना बक्षीस नेमले.
किल्ले पावनगडावरील ऐतिहासिक अवशेषकिल्ले पावनगडावरील ऐतिहासिक अवशेष (Historical remains at fort pavanagd) :
शिवमंदिर :
पावनगडावर तीन चार छोटेखानी मंदिरे आहेत .
त्यातील शिवमंदिर पाहण्यासारखे आहे. या मंदिराच्या गाभाऱ्यात एक पिंड अन अंगणात
दोन फुटक्या पिंडी पडल्या आहेत. तसेच पन्हाळ्यावरील तुटक्या नंदीची आठवण करून
देणारा भग्न नंदी देखील आहे. तसेच अंगणात भग्न पण आकर्षक गणपती बाप्पा ची मूर्ती आहे.
अंगणात दीपमाळ मात्र सुस्थितीत आहे. पावसाळ्यात शैवाळाची लाली दीपमाळेची शोभा
आणखीन वाढवते.
आणखी काही छोटी मंदिरे :
गडाच्या उत्तरेला दोन छोटेखानी मंदिरे आहेत. मंदिरात नंतर बसवलेल्या मूर्त्या आहेत. एका मंदिराच्या दारात हनुमानाची भग्न मूर्ती आहे.
किल्ले पावनगडावरील
मूर्तीविरहित मंदिर
पावनगडावर सध्या शिल्लक
असणाऱ्या अवशेषांमध्ये सर्वात सुस्थितीत आणि लक्ष वेधून घेणारी वास्तू म्हणजे हे
मंदिर होय. या मंदिरात कोणत्याही प्रकारची मूर्ती नव्हती काही वर्षांपूर्वी
शिवप्रेमींनी महादेवाच्या पिंडीची स्थापना केली आहे. मंदिर पूर्वकडे तोंड केलेले
असून या मध्ये एका गर्भगृह अन समोर सभागृह आहे. मंदिराच्या समोर नंदीचा चोपाळा आहे
. ह्यामध्येही नंदी नाही. यावरून हे मंदिर शिवमंदिर असावे असे अभ्यासकांचे मत आहे.
मंदिराचे सभामंडप पूर्णतः कमकुवत झाले आहे. चार दोन पावसाळेच कसेबसे तग धरू शकते.
त्याचे संवर्धन होणे गरजेचे आहे सुशोभिकरण नव्हे. आजकाल संवर्धनासाच्या नावाखाली
मोठ्या प्रमाणावर मूळस्वरूपाला धक्का पोहचत आहे. यावर सरकारचे नियंत्रण ठेवले
पाहिजे. असो ! ही वास्तू संवर्धित झाली पाहिजे. या मंदिराच्या समोर पडक्या
वाड्याचे अवशेष आहेत.
भग्न राजप्रासादाचे अवशेष :
शिवमंदिराचा {?} समोर आयताकृती एक भलीमोठी पडकी वास्तू दिसते.गडावरील सध्या
आस्तित्वात असणाऱ्या वाड्याच्या एकमेव पाऊलखुणा म्हणाव्या लागतील. त्याही पुसट होत
चालल्या आहेत. सध्या एका बाजूच्या दरवाज्याचे तेवढे जीर्ण झालेले अवशेष अस्तित्वात
आहेत. ही वास्तू आहे त्या स्वरुपात जतन झाली पाहिजे.
तुपाची विहीर :
पावनगडावरील सर्वात पसिद्ध
ठिकाण म्हणजे तुपाची विहीर होय . आज्ञापत्रात कातळात खोडून विहिरी करा असा आपल्यला
उल्लेख मिळतो पण पन्हाळा व पावनगड लेटेराईट म्हणजे जांभ्या खडकावर आहेत. अशा
परस्थितीत जांभ्या दगडातील विहिरीचे उपयोजन समजत नाही. अशाप्रकारच्या विहिरीत तूप
कुजवले जाई व युद्धात जखमी योद्ध्याच्या जखमेवर हे लावले जाई. जितके कुजलेले तूप
तितके ते उपयुक्त असत. छोटीश्या कुंडावर छत उभारले आहे. शेजारी आणखी एक कुंड आहे.
हि विहीर आवर्जून पहावी.
पावनगडाचे जलव्यवस्थापन:
पावनगडावर तुपाच्या
पाठीमागे जांभ्या दगडात खोडलेली भलीमोठी विहीर आहे. या विहिरीत उतरत जाण्यासाठी
पायऱ्या असून आता आयताकृती कमान दिसते आणि याच्या पुढे आयताकृती भलीमोठी विहीर
लागते. सामानगडावरील विहिरीची आठवण हि विहीर पाहताना होते. जांभ्या दगडात एवढ्या
मोठ्या प्रमाणावर हि विहीर खोदली असल्यामुळे यातून बांधकामासाठी जांभा दगड विपुल
प्रमाणात उपलब्ध झाला असणार यात शंका नाही. पण सध्या पावनगडावर मोठ्या प्रमाणावर
जांभ्या दगडातील बांधकाम दिसत नाही. या विहिरीसमोर पाणी साठवण्यासाठी दगडी भांडे
हि आहे.
हवालदाराच्या परड्यातील बाव :
माझे आजोबा हवालदारच परड
म्हणून एक ठिकाण दाखवत असत या ठिकाणी तुटपुंजे बांधकामाचे अवशेष शिल्लक आहेत. या
ठिकाणी एक बाव आहे. साधारणता ६० ते ७० फुट खोल बाव आहे परंतू यामध्ये सध्या पाणी
नाही. आत पाहिल्यानंतर मोठ्या प्रमाणावर कचरा दिसतो. ही बाव पाहताना रुंदी खूपच
कमी असलेली बाव कशी खोदली असेल ? हा प्रश्न मात्र उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही.
गुहेतील झरा :
गडाच्या दक्षिण दरवाज्याला
लागून तटामध्ये एक छोटीशी नैसर्गिक गुहा होती. त्यातून बारामहिने वाहता प्रवास
होता. सध्या ती गुहा मोडून तिथे विहीर बांधली आहे. तेथून आज गडावरील वस्तीला पाण्याचा पुरवठा होतो. जेव्हा गड राबता होता
तेव्हाही असाच याचा उपयोग होत असणार .
किल्ले पावनगडाचे बुरुज
पावनगडावर साधारणता १० ते
१२ बुरुज आहेत. त्यातील काहीच बुरुज सुस्थितीत आहेत.
पूर्व- दक्षिणेचा टोकावरील बुरुज :
सध्या बुरुजावर ढालकाठी फडकत असते. या बुरुजावरून वारणा , कासारी , पंचगंगा आदी नद्यांच्या सुपीक खोऱ्यावर नजर ठेवता येते. या बुरुजाचे आणखी एक वैशिष्ट्ये आहे. ह्या बुरुजाच्या शेजारी चिलखतामध्ये जाण्यासाठी दरवाजा आहे. यावरून बुरुजामध्ये खोली आहे असा समज अभ्यासकांच्या मध्ये आहे. अशी व्यवस्था अनेक बुरुजांवर दिसते. सध्या हा अर्धा बुरुज ढासळला आहे. या बुरूजाशेजारची तटबंधीही ढासळत आहे. या बुरुजावरून दख्खनचा राजा जोतिबाचे ही दर्शन घेता येते. या बुरुजाच्या थोड्यास अंतरावर आणखी एक बुरुज होता सध्या तो जमीनदोस्त झाला आहे. त्याच्या खाणाखुणा बारीक लक्ष दिल्या तर लक्षात येतात. उत्तरेला गडाच्या समोर छोटीशी माची आहे तसेच तेथे गडाची उंचीही कमी आहे . या ठिकाणी बुरुजांची शृंखला निर्माण करून गडाला मजबुती दिली आहे.
निशानीच्या
बुरुजाकडून चंद्र-सूर्य बुरुजाकडे जाताना वाटेत एक अनघड दगडांनी बनलेला बुरुज
लागतो. ह्या व चंद्र- सूर्य बुरुजाच्या आहारी गडासामोरील माची आहारी आणली आहे. या
बुरुजाच्या समोरील तटबंदी ढासळलेली आहे. या मुळे या बुरुजास हि धोखा निर्माण झाला
आहे. या बुरुजावर जाण्यास पायऱ्याचा छोटेखानी मार्ग आहे.
चंद्र- सूर्य बुरुज
या बुरुजाचे नाव ऐकले कि आपल्याला पारगड संबधी दिलेले शिवाजी महाराज यांचे पत्र आठवते , “चंद्र सूर्य असे पर्यंत गड जागता ठेवा.’’ या इथेही तेच सांगायचे असेल का ? या बुरुजावर चंद्र आणि सूर्याचे शिल्प कोरली आहेत.
हा बुरुज खूपच सुंदर आहे. हा बुरुज बांधताना निर्मात्याने येथील नागमोडी भौगोलिक परस्थितीचा फायदा उठवत हा बुरुज वक्राकार बनवला आहे. हा बुरुज पाहिल्यानंतर आपण पावनगडावर मोठ्या प्रमाणावर अवशेष नसल्याचे शल्य विसरून जातो. या बुरुजावरून आंबवडेच्या माचीवर लक्ष ठेवता येते. या बुरुजास लागून अलंगाचे अवशेष आहेत.पहारेकऱ्यांना निवाऱ्याची सोय असणारा बुरुज :
चंद्र- सूर्य बुरुजाच्या शेजारीच हा बुरुज आहे. या बुरुजामध्ये पहारेकऱ्यांना ऊनवारा आणि पाऊस यांच्यापासून संरक्षण आणि विश्रांती घेण्यासाठी निवाऱ्याची सोय केली आहे. या खोलीला कमान केल्यामुळे बुरुज लक्ष वेधून घेतो. या बुरुजाच्या समोर आणखी एक छोटासा बुरुज आहे. या बुरुजावरून संपूर्ण वारणा खोऱ्यातील हालचालीवर लक्ष ठेवता येते.
या बुरुजांच्या व्यतिरिक्त आणखी काही
बुरुज आहेत. काही पूर्णता ढासळून गेले आहे. काही ठिकाणी अंदाज लावावा लागतो.
गडाचे दरवाजे :
गडाचे मुख्य दोन दरवाजे होते. एक दरवाजा हा गडाच्या पश्चिमेला म्हणजे पन्हाळा आणि रेडेघाटीकडे तोंड करून असणारा होता तो इंग्रजांनी १८४४ च्या बंडात पाडून टाकला आता फक्त त्याच्या खुणा दिसतात. दुसरा दरवाजा हा मार्कंडेय ऋषीच्या गुहेपाठीमागे कोल्हापूरकडे तोंड असणारा होता . हा ही दरवाजा संपूर्ण ढासळलेला आहे. दरवाजाच्या पडक्या अवशेषांचा आपल्या या दरवाज्याची कल्पना येऊ शकते. या दरवाज्याच्या शेजारी एक दिंडी आहे. काही अभ्यासकांचे हा मुख्य दरवाजा आहे असे मत आहे. वस्तुस्थिती पाहता त्यांच्या मतामध्ये मध्ये काहीही तथ्य नाही.
या मुख्य दरवाज्याच्या व्यतिरिक्त गडावर आणखी दोन तीन छोट्या दिंड्या असायला हव्यात.
गडावरील तोफा :
सध्या दर्ग्याच्या परिसरात दोन तोफा
बुरुजावर ठेवलेल्या आपल्याला दिसून येतात. यातील एक तोफ पूर्वी जमिनीत रोवून ठेवली
होती. या व्यतिरीक्त आणखी काही तोफा गडावर होत्या. यातील काही तोफा शाहू
महाराजांनी किर्लोस्करकरांना नांगर बनवण्यासाठी दिल्या तर काही गडाच्या घेऱ्यातील
लोकांनी शेतीची अवजारे करण्यासाठी चोरून वितळून टाकल्या. याचे किस्से काही जुनी
माणस आजही सांगतात.
तटबंदी :
गडाच्या सभोवताली कमी उंची आहे तसेच चारही बाजूस माच्या आहेत . त्यावरून गडावर हल्ला करणे सोपे आहे . त्यामुळे गडाला बळकटी देण्यासाठी मजबूत तटबंदीची आवश्यकता भासणे साहजिकच आहे . पावनगडाच्या चारही बाजूस मजबूत तटबंदीचे संरक्षण दिले आहे . काही ठिकाणी साधारणतः 14 फूट उंचीची तटबंदी आहे . सध्या मात्र मोठ्या प्रमाणात तटबंदी ढासळत आहे .
पन्हाळगड का ढासळतोय ? भाग २ Downfall of panhala fort
पावनगडाच्या आसमंतात
:
वाघजाई मंदिर : पावनगडाच्या
माचीस सध्या बुधवारपेठ पैकी कदमवाडी नावाची छोटीशी वाडी आहे. येथे वाघजाईचे सुंदर
मंदिर आहे. हि पंचकृषीची देवता. मंदिरात वागजाई व जुगाई यांचा तांदळा आहे. त्यास
मुखवटे बसवले आहेत. या मंदिराच्या परिसरात अनेक भग्न मूर्त्या पडल्या आहे. या मंदिराचे
अनेक उल्लेख आपल्याला कागदपत्रातून मिळतात. या मंदिराच्या समोर शाहूकाळामध्ये
वाघजाई बाग होती आता फक्त तत्कालीन विहीर आहे. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज
यांनी पन्हाळा परिसरात चहा, वेलदोडे आदींचे उत्पादन घेण्यासाठी बागा निर्माण
केल्या होत्या. त्यातील पावनगडाच्याकुशीत जगदाळेबाग, वागजाई बाग आदी होत्या यांचे
नियोजन भोसले पाहत होते.
पाताळनगरी : छत्रपती
शाहू महाराजांनी पन्हाळ्यावरून कचेऱ्या पावनगडाच्या पायथ्याला आणल्या होत्या.
परंतू पुन्हा त्यांनी त्या पन्हाळगडावर नेल्या. या कचेऱ्यांची दगड स्थानिकांनी घरे
बांधण्यासाठी नेली . सध्या या परिसरात दोन अज्ञात वीरांच्या समाध्या आहेत.
तसेच पावनगडाच्या पायथ्याला बुधवारपेठेत मारुतीची मूर्ती सुंदर आहे. याव्यतिरिक्त पंचक्रुशीत अनेक छोटीमोठी मंदिरे पाहण्यासारखी आहेत.
किल्ले पन्हाळगडाचा सोबती असणारा किल्ले पावनगड तिन्ही ही ऋतूत आपल्याला मोहनी घालतो. आपणास किल्ले पावनगडाच्या भटकंतीचा अफलातून अनुभव घ्यायचा असेल तर पुढील मार्गांनी नक्की किल्ले पावनगड पहा.
१) पिंपळे तर्फ सातवे (बांबरवाडी) - वाघजाई मंदिर (कदमवाडी) - किल्ले पावनगड
२) पोर्ले - मसाई मंदिर - धबधबेवाडी - रेडेघाटी - किल्ले पावनगड
३) आसुर्ले - दरेवाडी - राक्षी - किल्ले पावनगड
४) बुधवार पेठ - मराठी शाळेशेजारील पायवाटेने - किल्ले पावनगड
५) बुधवार पेठ - फरसबंदी मार्ग - पश्चिम दरवाजा - किल्ले पावनगड
६) किल्ले पन्हाळा - कालीबुरुज - पडकोटातील भुयारी मार्ग - रेडेघाटी - किल्ले पावनगड
शिवनिर्मित किल्ले पावनगड Younger brother of Panhala Fort- Pavangad (Built by Chhatrapati Shivaji Maharaj) या ब्लॉगमधून पावनगडाविषयी थोडक्यात माहिती
सांगण्याचा प्रयत्न केला आहे. पुढील भागात गडाच्या इतिहासाविषयी सविस्तर
माहितीसहित भेटू ! हा ब्लॉग कसा वाटला ? हे मला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर
नक्की शेअर करा. आणि हो फॉलो ही करा.
फोटो साभार : स्वप्नील पाटील (उपाध्यक्ष ,पर्णाल इतिहास संशोधन मंडळ , पन्हाळा )
धन्यवाद !
कोल्हापूर जिल्ह्यातील अपरचित कोट गिरगाव Witness of the prowess of Firangoji Shinde: Kot Girgaon


















1 टिप्पण्या
ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा .
उत्तर द्याहटवानवीन टिप्पण्या अनुमत नाहीत.