दशनामपंथीय गोस्वामी
(गोसावी) संप्रदाय एक अध्यात्मिक चिंतन
- प्रा. आनंद गिरी
प्राचीन काळापासून दशनाम गोस्वामी
संप्रदाय हा हिंदू संप्रदाय हिंदुस्थानात पहावयास मिळतो. त्याचे विविध पुरावे
शिलालेख व प्राचीन ग्रंथामधून दिसून येतात. खर तर या संपद्रायास हिंदू यतींचा वर्ग
असे संबोधतात. आर्यांचे चार वर्ण, चार आश्रम व सोळा संस्कार पाहिल्यानंतर विशिष्ट
वर्ग पहावयास मिळतो. याला संन्याशांचा वर्ग असेही म्हणतात. हा संप्रदाय तीन
वर्णाशी जवळचा आहे. (ब्राम्हण,क्षत्रिय व वैश्य) मात्र हा शुद्रांसारखा सेवावृतीचा
संप्रदाय आहे. धार्मिक कार्य यांच्याकडून होतेच परंतू समाजाची सर्वपरीने सेवा केली
जाते. हे या संप्रदायाचे वैशिठ्ये आहे. हा संप्रदाय इतर संप्रदायांच्या जवळचा
वाटतो. शैवसंप्रदाय ,शाक्तसंप्रदाय, वैष्णव संप्रदाय, दत्त संप्रदाय, नाथ
संप्रदाय, वारकरी संप्रदाय, बौध्द धर्म व त्यातील महायान व हीनयान संप्रदाय,
लिंगायत संप्रदाय इत्यादी हि यती भगवान शिव,भगवान विष्णू या देवतांना आराध्य दैवत
मानतात काही यती शाक्तसंप्रदायी असून कालीमातेचे उपासक आहे तसेच अष्टभैरवाचेही
उपासक आहेत. भारतवर्षामध्ये अनेक ठिकाणी त्यांचे वास्तव्य असून तेथील देवदेवतांचे
पौरोहित्य करतात. आद्यशंकराचे ही मंडळी शिष्य होत त्यांच्या अव्दैतमताचा त्यांनी
भारतवर्षांमध्ये प्रसार केला असा इतिहास सांगतो. अव्दैत म्हणजे (आत्मा परमात्मा एक
आहेत) त्यांनी व्दैतवादाला कडाडून विरोध केला आहे. ‘ ओम नमो नारायण’ हा मंत्राचा
स्वीकार करताना दिसत आहेत. ‘ओम नमो नारायण’ प्रमाणे ‘ओम नमः शिवाय’ ‘ओम श्री
गुरुदेव’ तसेच ‘आदेश है गुरुका’ याचाही स्वीकार करतात म्हणजे सर्व संप्रदायाशी हा
समाज जवळीक साधण्याचा त्यांचा प्रयत्न करतो आहे. या लोकांशी प्राचीनकाळी व मध्य
युगात स्वतःची राज्ये देखील निर्माण केली होती मात्र हिंदू धर्म जागृती हे त्यांचे
महत्वाचे कार्य आहे. त्याला प्राचीन ग्रंथाचा आधार आहे. यांनी योगतंत्राचा स्वीकार
केला असला तरी त्यांनी सेवावृत्ती सोडली नाही. या सांप्रदायाचा इतर
संप्रदायाप्रमाणे वेगळपण असूनही ती सर्व समावेशक आहे. भारतवर्षातील ज्या ज्या
प्रांतात हे लोक आहेत. त्यांनी तेथील व्यवस्थेशी जुळवून घेतलेले आहे. त्यातून आपले
वेगळेपण ते दाखवत नाहीत. त्यांनी तेथील आचार विचाराचा स्वीकार केलेला असतो. वेदकाळापासून
या हिंदू यतींचा वावर या भारतवर्षात आहे. इतर सांप्रदायाप्रमाणे हा हिंदूंचा वेगळा
संप्रदाय म्हणून पुढे आलेला नाही. धार्मिक, सामाजिक व राजकीयदृष्ट्या या सांप्रदायाचे
कार्य मोठे असून तरी देखील स्वतंत्र मतप्रवाही नाही. काही थोड्याच इतिहास व समाज
शास्त्रीय संशोधकांनी या सांप्रदायाविषयी आपले विचार मांडले आहेत. खर तर या
सांप्रदायाचा वेगळा असा अभ्यास व्हायला पाहिजे आजच्या युगात पुरोगामित्वही त्यांनी
स्वीकारले आहे. विज्ञानाचीही कास धरली आहे. आपली लोकसंस्कृती टिकवण्याचा त्यांचा
यशस्वी प्रयत्न आहे.
प्राचीन कालखंडापासून भारतवर्षात हा
संप्रदाय दिसून येतो म्हणजे कालदृष्ट्या हा सर्वात जुना असावा. या सांप्रदायाचा
अभ्यासावरून साधारणपणे या संप्रदायाची चार वैशिष्ट्ये आहेत ती भारतातील इतर
धार्मिक सांप्रदायात अथवा पंथात आढळून येत नाहीत. पहिले वैशिष्ट्ये म्हणजे प्राचीन
संप्रदाय आहे. दुसरे वैशिष्ट्ये म्हणजे
राजकीय, राजनैतिक, आर्थिक, व सांस्कृतिक अशा विविध प्रकारची अष्टपैलू
कामगिरी बजावणारा म्हणजे ब्राम्हण, क्षत्रिय व वैश्य यांची कर्मे शूद्रांच्या
सेवावृतीने पार पडणारा हाच एकमेव संप्रदाय आहे. या संप्रदायाचे तिसरे वैशिष्ट्ये
म्हणजे प्राचीन काळापासून अनेक राजघराण्यांशी मैत्रीही केली व शत्रुत्वही पत्करले.
मात्र हिंदू धर्मायी जागृती केली व नवविचारही आत्मसात केला. १८ व १९ व्या शतकात
मराठे, राजपूत,जाट, बुंदले, मुघल, इंग्रज यांच्या बाबतीत असेच दिसून येते,
म्हणजे काही वेळा मैत्री केली व त्यांचे शत्रुत्वही स्वीकारले, त्यांचे चौथे
वैशिष्ट्ये म्हणजे त्यांनी सर्व राज्यकर्त्यांशी ज्याप्रमाणे विश्वास संपादन केला.
त्याप्रमाणे इतर कोणी संपादू शकले नाहीत. मात्र संप्रदायाविषयी फारशी माहिती
उपलब्ध होऊ शकत नाही, तरी सुद्धा इतिहास संशोधक वि. का. राजवाडे, सर जदुनाथ सरकार,
समाजशास्त्र अभ्यासक डॉ. घुर्ये, इंग्लिश लेखक एच.एच. विल्सन, देवदत्त भांडारकर,
डॉ. माधव कंटक आणि पृथ्वीगिरी गोस्वामी
यांनी या संप्रदायाविषयी संशोधन करून काही अंशी वेगळा प्रकाश टाकला आहे. तो फारच
तोकडा आहे. हा संप्रदाय विविध संप्रदायामध्ये मिसळला आहे. त्यामुळे वेगळेपण दाखवता
येत नाही असे दिसून येते.
‘गोस्वामी’ हा शब्द प्राचीन वैदिक
वाड्मयामध्ये बरेच वेळा दिसून येतो. ‘गोस्वामीन’ या संस्कृत शब्दापासून ‘गोस्वामी’
हा शब्द बनला असून त्याचा ‘गोसाई’ व ‘गोसावी’ असे अपभ्रंशशब्द बनलेले आहेत. या
संप्रदायातील लोक भारतामध्ये प्राचीन काळापासून आढळणारे हिंदू ‘यती’ लोक होय.
यामध्ये तिन्ही वर्णांचे लोक असावेत. ‘गोस्वामी’ शब्दाचे दोन अर्थ सांगितले आहेत.
‘गो’म्हणजे गोधन (गायी) व त्यांचा मालक , दुसरा अर्थ ‘गो’म्हणजे इंद्रिये त्यांचा
स्वामी जो जितेंद्रिय असतो. हा संप्रदाय प्राचीन काळापासून भारतीय उपखंडात सर्वत्र
विखुरलेला आढळतो. तरीसुद्धा हे शैव, वैष्णव, शाक्त, नाथ, बौद्ध, दत्त, जैन
संप्रदायाशी जवळचे वाटतात. तसेच ते ‘समन्वयवादी’ आहेत यांच्यामध्ये बैरागी,
दंडी, रावणवंशी, महंत संन्याशी असे उपपंथ असून गिरी, पुरी, भारती, तिर्थ, आश्रम, वन,
पर्वत, सागर, अरण्य, सरस्वती अशी दहा उपनावे (पंथ) असून हाच दशनामपंथीय
गोस्वामी संप्रदाय होय. दक्षिण महाराष्ट्रात देशनाम गोसावी संप्रदाय म्हणतात. “गोसावी”
हा गोस्वामीपासून अपभ्रंश झालेला शब्द आहे.
गिरी – “गिरीकंदात नित्य वास करणारा, गीतेचे अध्ययन
करणारा, तत्पर गंभीर आणि जो स्थिर बुद्धी असतो त्याला गिरी म्हणतात.’’ धार्मिक,
सामाजिक व राजकीयदृष्ट्या यांचे कार्य महत्त्वाचे आहे.
वन – “आशा विरहित होवून वनात रम्य अशा झऱ्याच्या
काठी जो वास करतो त्याला ‘वन’ असे म्हणतात.” आज संन्याशा बरोबर गृहस्थी देखील
आहेत.
तिर्थ – “तत्वमासि” या महावाक्यात तीन पदे आहेत. जणू
त्रिवेणी संगमाचे तिर्थ तत्वार्थ भावाने जो स्थान करतो. त्याला ‘तिर्थ’ असे
म्हणतात.” सनतनन्व बरोबर पुरोगामी
विचाराचा स्वीकार केलेला असतो.
आश्रम - “
ज्याची आसक्ती नष्ट झालेली असून प्रौढ यतायतींपासून मुक्त आणि आश्रमात राहणारा जो
(गोस्वामी) , त्याला आश्रम असे म्हणतात. आज भारतवर्षात सन्याशांचे आखाडे आहेत.
तेथे त्यांचे वास्तव्य असते.
अरण्य – “सर्व जगाचा त्याग करून जो अरण्यात अर्थात
नित्यानंद युक्त नंदनवनात राहतो त्याला अरण्य अशी संज्ञा आहे.” हा देखील
संन्याशीवृत्ती जोपासणारा आहे.
पर्वत – “पर्वताच्या पायथ्याशी राहणारा श्रेष्ठ ज्ञानी
व सारासार विवेक जोपासणारा तो पर्वत होय.’’
आज हे गृहस्थी आहेत.
सागर – “सागराप्रमाणे तत्वज्ञानात गंभीर ज्ञानरत्नाचा
साठा असणारा धर्म मर्यादा न ओलांडणारा तो सागर होय.” हे काही संन्याशी असून आज
गृहस्थी देखील आहेत.
सरस्वती : “नित्य स्वरज्ञानात विरत, स्वरवारी, कवीश्वर
तसेच संसार सागराच्या धारा प्रवाहाचे हनन करणारा तो सरस्वती होय.”
धर्मशास्त्राबरोबर समाजशास्त्राचा अभ्यासक असतो तसा तो विज्ञाननिष्ठही असतो.
भारती – “संसारातील सर्व भर टाकून देवून फक्त विद्येचा भार
बाळगणारा व ज्याला दुःखाचा भार माहित नाही त्याला भारती म्हटले जाते.” जरी
संसाराचा त्याग करणारा असला तरी आज धार्मिक वृत्ती बरोबर समाज प्रवाहात रमणारा
गृहस्थी देखील आहेत.
पुरी – “ज्ञानतत्वाने परिपूर्ण, पूर्णत्वपदी राहणारा
आणि परब्रम्हात रममाण होणारा तो पुरी संज्ञक होय.” हे धर्मशास्त्राचे जाणकार असून
संन्याशी आहेत तसेच गृहस्थी देखील आहेत.
ही दहा नावे
शंकराचार्यांच्या पूर्वी वैदिक समाजात कुळ नावे व उपनावे म्हणून रुढ होती. हे या
संप्रदायाचे अभ्यासक पृथ्वीगिरी गोस्वामींनी सिद्ध केलेले आहे व तसेच काही संशोकांच्या
मते यांनी शंकराचार्याच्या ‘अव्दैत’ मताचा प्रसार करून त्यांचे शिष्यत्व स्वीकारले
होते आणि त्यानंतरच या सांप्रदायाचा उदय झाला मात्र काही संशोधकांना हे मत मान्य
नाही. पुढील काळात काही गोस्वामी यती वैष्णव, बौद्ध, जैन व शीख धर्मामध्ये प्रचारक
बनले. बंगाल, आसाम मध्ये गोविंदगिरी, माधवगिरी, ईश्वर पुरी, माधवेंद्र पुरी यांनी
वैष्णव सांप्रदायाचा प्रसार केला असा उल्लेख आढळतो. या संप्रदायाचा इतिहास प्राचीन
असून अंगिरस कुळापर्यंत पोहचतो असे समाजशास्त्र संशोधक डॉ. घुर्ये व पृथ्वीगिरीचे
मत आहे. तसेच ‘यती’ ही आर्याची प्राचीन जमात असून ते यज्ञधर्मी होते. या परंपरेतील
वैदिक वाङ्मयात वशिष्ठ, शक्ती, पराशर, व्यास, गौतम, भृगू इत्यादी महर्षीमूनीची
नावे येतात. हे सर्व गृहस्थी होते. त्याचबरोबर दशप्रजापती भगवान शंकर हे देखील
गृहस्थी होते. दशप्रजापतीचे उपनाव ‘पर्वत’ असून तो महातपस्वी होता. दक्षाचे पुत्र
हे प्रजावृद्धीसाठी तपश्चर्या करीत असता “ ओम नमो नारायणाय पुरुषाय महात्मने
विशुद्ध सत्व धीष्णाय महाहंसायधीमाही” हा मंत्र जपत होते. आज ही या संप्रदायातील
लोक नारायणाची आराधना करतात व ज्यावेळी हे एकत्र येतात त्यावेळी नमस्कार “ऐवजी’’
“ओमनमोनारायण” असे संबोधतात.
या परंपरेत गृहस्थी व संन्याशी असे दोन
भेद प्रकार आहेत. गृहस्थींना “घरबारी” किंवा “दारविहारी” असे म्हणतात. तसेच
संन्यासीना “स्वैरी” असे म्हटले जाते. रामायण, महाभारत, कालखंडात सांधूच्यात
गृहस्थी व संन्यासी असे भेद होते. त्याचबरोबर मुंडी, दंडी, परिव्राजक असे ही भेद
होते. बौद्ध ग्रंथामध्ये “मुंदशावक, जटीलंक, त्रिदंडी, देवधार्मिक ” असे भेद
सांगितले आहेत.
पंचविश ब्राम्हण, हरीवंश, अथर्ववेद इत्यादी
ग्रंथामध्ये दशनाम्याचा धागादोरा सापडतो. गोसावी पंरपरेतील अंगरिस हा स्मृतीकार
होता त्याच बरोबर फलज्योतिष शास्त्राचा अभ्यासकही होता. अंगरिसकुल, भृगूकुल,
यतिकुलाचाही उल्लेख प्राचीन ग्रंथात असून अंगीरसाने अर्थववेदाचा बराचसा भाग रचलेला
आहे.
ग्रीक राजा अलेक्झांडरच्या (सिकंदर)
स्वारीच्यावेळीत पंजाबात “ग्लोसाई” हे गोसाव्याचे राज्य होते. असे डायोडोरस या
प्राचीन ग्रीक इतिहासकाराने म्हटले आहे. तसेच या लोकांनी सिकंदराला प्रतिकार केला.
परंतु ते अयशस्वी झाले. त्याचबरोबर प्राचीन ग्रीक इतिहासकाराने म्हटले आहे. तसेच या लोकांनी सिकंदराला
प्रतिकार केला. परंतु ते अयशस्वी झाले. त्याचबरोबर प्राचीन ग्रीक इतिहासकर
मेगस्थेनिस यांच्या लिखाणात तक्षशीले जवळ अनेक नग्न साधु राहत होते पुढे
मेगस्थेनिस म्हणतो, “भारत देशात संन्यांशी लोकांना फार मान आहे हे सर्व ब्रम्ह
जाणणारे ब्राम्हण असावेत.” कित्येक नग्न आहेत व कित्येक जटा वाढवून राहतात. तसेच
काही गृहस्थी असून पुरोहित आहेत. नग्न साधुंचे इंद्रिय मदत प्रशंसनीय आहे.
कल्हणाने आपल्या ‘राजतरंगणी’ या ग्रंथातही गोसावी सांधुची प्रशंसा केली आहे तसेच
तो पुढे म्हणतो. “काश्मीरच्या संधी नामक राजाच्या दरबारात अनेक गोसावी साधु
आश्रमात होते. इ.स. ३०० च्या दरम्यान परिव्राजक ब्राम्हण व क्षत्रिय यतींची
बुंदलखंड व मध्य भारतात स्वतंत्र राज्ये होती. वाकाटक काळातही काही ब्राम्हण व
क्षत्रिययतींच्या राज्यांचा उल्लेख आहे ते गुप्तराजाचे मांडलिक होते. चितोडच्या
गुहिलवंशाचा बाप्पारावळ हा राजा शैव यती असून तो हरितमूनी नावांच्या गोस्वामीचा
शिष्य होता असे देवदत्त भांडारकरांनी शिलालेखाच्या आधारे दाखवून दिले आहे.
बाप्पारावळच्या कालखंडापासून रजपूत व गोसावी यांचे गुरु शिष्यांचे नाते दिसून
येते. दशनामी गोस्वामी हे रजपूतांच्या एकलिंगजी देवतचे पुरोहित, पुजारी असून
त्यांना राजस्थानी लोक गुरुस्थानी मानतात. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही गुरुशिष्य
परंपरा दिसून येते. तसेच महाराष्ट्रातही दशनामी ग्रामदेवतेचे पूजारी आहेत. ७ व्या,
८ व्या शतकात अबूझेद व इफुमसुरी हे अरबी प्रवासी हिंदुस्थानात येवून गेले
त्यांच्या लिखाणात दशनामी गोसाव्यांचा सर्व पैलूची माहिती आलेली आहे. प्राचीन
काळापासून दशनामी गोस्वामीना धार्मिक कार्यात महत्वाचे स्थान होते. ते १७ व्या
शतकापर्यतही दिसून येते. तसेच आजच्या शतकातही धार्मिक कार्य सुरु आहे. १७ व्या
शतकात छत्रपती शिवाजी महाराजांनी निश्चलपुरी करवी दुसरा तांत्रिक राज्याभिषेक
करवून घेतला होता. गागाभट्टाच्या वैदिक राज्याभिषेकाला तांत्रिक त्रुटीमुळे विरोध
केला. यावरून सिद्ध होते यापूर्वी राजकीय क्षेत्रातही त्याचे उच्च दर्जाचे संबंध
दिसून येतात. त्यांच्या स्वतंत्र सैनिकी फलटणी होत्या. पृथ्वीराज चौहान, राजाजयचंद
(कनोज) व चंदेल राजे यांना दशनामींच्या सैन्याचा मोठा उपयोग झाल्याचा उल्लेख
आढळतो. याविषयीची माहिती चांदबराईच्या पृथ्वीराजरासोत आली आहे. तसेच
राजस्थानाचा इतिहास लिहिणारा कर्नल टॉडच्या लिखाणात दशनामी गोसावी हे राजकीय क्षेत्राबरोबर धार्मिक कार्य, युद्धे,
सावकारकी अशा सर्व क्षेत्रात गुंतलेले होते. त्यांचा व शंकराचार्याच्या
अव्दैतमताची फारसा संबंध नसावा. परंतु कर्नल टॉडच्या या मतांशी काही संशोधक सहमत नाहीत. दशनामी गोस्वामी हे अव्दैतवादी होते.
त्यांनी आपल्या स्वतंत्र पिठांची व मठांची उभारणी राजस्थानमध्येच केली असावी. टॉडने राजस्थानमधील दशनामी गोस्वामी सरदार व जेरुसलेम येथील सेंट जॉनच्या सरदारांशी तुलना केलेली आहे तसेच त्यांच्या धार्मिक व राजकीय वैभवशाली परंपरेचीही,
माहिती देतो. मारवाडमधील जालंधरनाथ या दशनामीच्या वैभवाची ही वेगळी परंपरा
सांगितली आहे तो तेथील समाजाचा मुख्य पुरोहित असून त्याला उच्चस्थानी मानत होते.
आजही राजस्थानमध्ये पुरोहिताची कामे होत आहेत. तसेच भारतवर्षात ठिकठिकाणी मठ असून
तेथून पौरोहित्य चालते मात्र सेवावृत्ती जोपासली जाते.
मुघलबादशहा औरंगजेबाच्या कर्मठ धर्मवादाला
गोसावी सैन्यांनी मोठा प्रतिकार केल्याचा उल्लेख आहे. त्यांनी स्वधर्माच्या
रक्षणासाठी मोठा पराक्रमही गाजवला होता. मराठ्यांच्या बहुतेक लढायातून दशनामींच्या
सैन्याने भाग घेतला होता. त्याला पानिपतच्या तिसऱ्या युद्धाचा अपवाद होता. त्यांचे
व पेशव्यांचे थोडेसे बिनसलेले दिसते. महादजी शिंदेचा जो उत्तरेत दरारा होता .
त्याला अनुपगिरी गोस्वामीच्या फलटणीची मोठी साथ होती .म्हणजे लष्करीदृष्ट्या
दशनामी गोस्वामी परंपरेचे महत्व अनन्य साधारण दिसते. हे सैनिक निष्ठेने लढणारे,
लढताना स्वतःचे प्राण कस्पटासम मानणारे असा त्यांचा लौकिक होता. औरंगजेब व महमंदशहा
अब्दालीच्या सैन्यांनी वृंदावन, काशी, मथुरा इत्यादी धार्मिक स्थळांच्या ठिकाणी
केलेले हल्ले व त्याला दशनामींच्या सैन्यांनी केलेला प्रतिकार व बलिदान प्रसिद्ध
आहे. दशनामी गोस्वामी जरी पानिपतच्या युद्धात पेशव्यांच्या विरोधात होते तरी
पानिपतच्या युद्धात मारले गेलेले भाऊराव व विश्वासराव यांच्या शवाला (प्रेतांना)
मंत्रान्गि देण्याचे काम आपला जीव धोक्यात घालून अनुपगिरी व उमरावगिरी यांचे धाडस
फार मोठे होते. हे धाडस करून त्यांनी सेवावृत्ती जोपासली होती. यापूर्वी
शिवछत्रपती व धर्मवीर छत्रपती संभाजी राजेंच्या कार्यात दशनामी गोस्वामीनी मोठे
सहकार्य केलेले आहे व स्वराज्याच्या कार्यात स्वयं योगदान देणारे दशनामी गोस्वामी
होत.
राजनैतिकदृष्टाही या संप्रदायाचे महत्व
अनन्यसाधारण होते. त्यांनी अनेक राजकर्त्यांना आर्थिक मदत केल्याचा उल्लेख आढळतो.
गृहस्थी गोस्वामी हे गर्भश्रीमंत होते. त्यांनी व्यापारी क्षेत्रातही क्षेष्ठत्व
सिद्ध केल्याचा उल्लेखही कागदपत्रांमधून आढळतो. त्यांच्या मठांच्या व आखाड्यांच्या
मोठ्या जमीनी होत्या, तसेच शेती व्यवसायातही प्रगती साधलेली होती त्यामुळे अनेक
राजदरबारातही त्यांना मनाचे स्थान होते. कर्नाटकातील सोंडूरकर हिंदुराव व
व्यंकटराव घोरपडे सरकारांना जयसिंगगिरी व उमेदगिरींनी अनेक वेळा एक रुपयाला एकदमडी
व्याजाने कर्जे दिली होती. त्याबदली घोरपड्यांकडून इनाम जमीनी मिळाल्या होत्या.
हैदराबादच्या निजामाला १ कोटीचे कर्ज दिल्याचे व त्याबदले वऱ्हाड प्रांत ५ वर्षे
गहाण ठेवल्याचा उल्लेख येतो. पहिल्या बाजीरावांच्या मृत्यूनंतर त्यांचे जें कर्ज
होते त्यापैकी ५० लाखाचे कर्ज उदयपुरी गोसाव्याचे होते. नागपूरचे मुधोजी व जानोजी
भोसल्यांनाही दशनामी गोस्वामींनी कर्जे दिली होती. छ. राजाराम महाराजांचा मावळचा
सुभेदार पंताजी शिवाजी सोमण यालाही गोसावींच्याकडून कर्जे दिल्याचे उल्लेख आहे.
धारवाडचे गिरी हे मोठे जहागीरदार असून निम्मे धारवाड त्यांच्या मालकीचे होते.
ब्रिटीशांनी त्यांना रायबहादुरीही किताब दिला होता. त्यांची स्वतःची राज्ये होतीच
तसेच जेथे जेथे मठ आहेत तेथे तेथे त्याची जहागिरी व जमीनी मोठ्या प्रमाणात आहेत.
दशनामी दीक्षाविधी :
दशनामी गोस्वामी संप्रदायाचे प्रमुख चार
मठ व तीन उपमठ असून बावन मठ्या (आखाडे) आहेत. त्याठिकाणी दीक्षा विधी कार्यक्रम
केला जातो. हा दीक्षाविधी आज संन्यासी साधुंसाठीच आहे. मठ प्रमुखाला महंत असे
म्हणतात. या मठांना इनामी जमिनी आहेत. या संप्रदायात कोणत्याही वर्णातील लोकांना
दिक्षा घेता येते. जो दीक्षा घेतो त्याला आदल्यादिवशी उपोषण करावे लागते त्यांचे
दुसऱ्या दिवशी मुंडण करून सर्वांगाला भस्म लावले जाते. त्याला तात्पुरते वेगळे नाव
दिले जाते व तो दीक्षा घेण्यास पात्र होतो. त्यानंतर दोन तीन वर्षे गुरूच्या सेवेत
घालवावी लागतात. दरम्यान या पंथाच्या आचार विचाराची ओळख होते. पुढे गुरु त्याला
‘सोहम’ मंत्र त्यांच्या कानात उच्चारतो आणि एकनिष्ठेची शप्पथ घ्यावयास लावतो.
त्यानंतर त्याला भगवी वस्त्रे परिधान करावी लागतात. त्यानंतर विरता होम करून
दिक्षा विधी भोजन समारंभ होतो. त्यानंतर दिक्षा घेतलेल्या व्यक्तीस ब्रम्हचर्याचे
पालन करावे लागते व भिक्षेवरच निर्वाह करावा लागतो व त्याची तिर्थ यात्रा व मठांना
भेटीसाठी भटकंती सुरु होते. या संन्याशाच्या झुंडी असतात. या लोकांना तपश्चर्या
खडतर करावी लागते. ते प्रचंड देहदंड सोसताना कडक उन्हात पंचाग्नी साधन करणे, कडक
थंडीतही तपश्चर्या करणे, एका पायावर कित्येक दिवस उभे राहणे यातून परमात्मा
प्राप्तीसाठी ध्यानसाधना करावी लागते. दशनामी संप्रदायामध्ये बैरागी, दंडी व
रावणवंशी असे उपपंथ असून यांचा काही वेळा संघर्ष झालेला आहे. गोस्वामी व बैरागी
यांच्यात सन १५६० मध्ये (सम्राट अकबर कालखंड) हरिद्वार येथे कुंभ मेळ्यात स्नान
प्रथम कोणी करावयाचे यातून वाद निर्माण झाला होता. त्यावेळी १८ हजार बैरागी मारले
गेल्याचा उल्लेख आहे. हा संघर्ष टोकाचा होता. गोसाव्यांपेक्षा बैरागी हे मोठ
मोठ्या मठांचे मालक आहेत. मात्र हिंदू धर्म जागृती व समाज उपयोगी कामे
त्यांच्याकडून केली जातात.
दशनामी संप्रदायाची
मर्थिक प्रथा :
या संप्रदायातील व्यक्ती मरण
पावल्यानंतर त्याला पद्मासन अवस्थेमध्ये खड्डा काढून बसविले जाते. त्यापूर्वी
त्याला भगवी वस्त्रे घालून झोळी, दंड इत्यादी वस्तू बरोबर ठेवल्या जातात.
झोळीमध्ये कडधान्य, भोपळा, भाकरी ठेवली जाते तो शैव असेल तर बेल व वैष्णव असेल तर
तुळशीची पाने त्याच्या डोक्यावर ठेवली जातात. त्याला समाधिस्त अवस्थेमध्ये
बसविल्यानंतर त्यावर मातीचे आवरण घालून दगडी पादुका किंवा महादेवाची पिंड ठेवली
जाते. प्राचीन काळापासून अनेक साधूंनी जीवंत समाधी (संजीवन समाधी) घेतल्या आहेत
याचाही उल्लेख येतो. या संप्रदायात मृताबद्द्ल फारसा शोक करत नाहीत मात्र आजच्या
काळात गृहस्थी दशनामीच्यावर इतर संप्रदायी प्रभावामुळे शोक करण्याचीही प्रथा दिसून
येते. शैव, वैष्णव, शाक्त, दत्त व नाथपंथीय असला तरी त्याला समाधीस्त केला जातो.
आज काही ठिकाणी मंत्रांग्नी दिला जात आहे. गृहस्थीना मंत्रांग्नी द्व्यावा अशी
विचारधाराही पुढे येत आहे.
प्राचीन काळापासून सर्व क्षेत्रात अष्टपैलू कामगिरी करणारा हा संप्रदाय इतर संप्रदाय व पंथाशी तुलना केली तर आज उपेक्षित राहिला आहे. परंतु हा उपेक्षित का राहिला असा प्रश्न निर्माण होतो. त्यांच्या अंगी विविध गुण असले तरी त्यांना योग्य दिशा व वळण देणारे ध्येयवादी नेतृत्व लाभले नाही असे दिसते. त्यामुळे धार्मिक क्षेत्रात परिपूर्णता असून देखील अध्यात्मिकता साधता आली नाही. त्रिवर्निकांचे गुण त्यांच्या अंगी असून त्यांनी ऐहिक प्रगतीही साधली नाही. तसेच प्रजा हितदक्ष व स्वतंत्र राज्यही मध्ययुगात स्थान केले परंतु ते राजकीय क्षेत्रातही मागे पडले आहेत. त्यांनी मात्र राज्यकर्त्यांकडून आर्थिक लाभ उठविला. मात्र त्यांनी मैत्रीही केली व शत्रुत्वही स्वीकारले हा त्यांचा स्वभाव धर्म होता. या पाठीमागे महत्त्वाचे म्हणजे हा सर्वांगपूर्ण वैशिष्ट्ये असणारा संप्रदाय स्वधर्म रक्षणासाठी प्राणपणाने लढला आहे. तसेच सर्व क्षेत्रात उच्चस्थानाला पोहचला असून हि विशिष्ठ ध्येय ठेवून या संप्रदायाला कार्य प्रवण करणारा कल्पक नेता मिळाला नाही मात्र हा संप्रदाय हिंदू धर्मातील सर्व संप्रदायाशी जवळचा वाटतो तो समन्वयवादी असून उदारमतवादी विचाराकडे झुकला आहे तसेच गृहस्थी व संन्यासी यामध्ये विभागाला गेल्याने सांप्रदायिक एकता निर्माण करता येत नाही. मात्र भारतवर्षात या संप्रदायाची ओळख अनन्य साधारण आहे. आज भारत सरकारने या संप्रदायाचा भटक्या विमुक्त जमाती मध्ये समावेश केलेला आहे. संपूर्ण भारतामध्ये हा समाज (संप्रदाय) विखुरला गेला आहे आणि भिन्न भाषिक असल्याने त्यांच्यामध्ये ऐक्य होवू शकत नाही. तरीसुद्धा आज धार्मिक कार्याबरोबर हे लोक विज्ञाननिष्ठ व पुरोगामी बनले आहेत. महाराष्ट्रा मध्ये काही गावांमध्ये मठ आहेत. तेथील मठांच्या प्रमुखास उत्तर भारतातून येणाऱ्या संन्याशांच्या झुंडीचे स्वागत करावे लागते त्यांची भोजनाची व्यवस्था करावी लागते. त्यांना सर्वांनी सहकार्याकरून त्यांचा मानसन्मान करून त्यांना निरोप द्यावा लागतो. या झुंडी १२ वर्षांनी एकदा येतात. संन्याशांचे भारतात ठीक – ठिकाणी आखाडे आहेत. तेथे संन्याशी सांधुंचे वास्तव्य असते तसेच अनेक ठिकाणी गावागावातून गृहस्थी दशनामी संप्रदायी असून ते लोक स्थानिक परंपरेनुसार आपले व्यवहार करतात . हे सर्वसमावेशक असल्याने या संप्रदायाची स्वतंत्र ओळख झालेली नाही .
- धन्यवाद
लेखकांविषयी:
बारा बलुतेदार, कवी शंकरराव व भेदिक शाहिरी, लोकसंस्कृतीचे उपासक, महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर
"दशनामपंथीय गोस्वामी (गोसावी) संप्रदाय एक अध्यात्मिक चिंतन " हा आजचा लेख कसा वाटला ते नक्की कमेंट करा. आवडला तर शेअर करा आणि हो फॉलो करायला विसरू नका.
0 टिप्पण्या