महाराष्ट्रातीची भेदिक शाहिरी व परंपरा
प्रा. आनंद गिरी
माजी इतिहास विभाग प्रमुख
छ. शहाजी कॉलेज , कोल्हापूर
भेदिक म्हणजे अध्यात्म व तत्वज्ञानाचा काव्य रचनेच्या माध्यमाद्वारे उलघडा करणे. भेद म्हणजे रहस्य. आध्यात्मिक कटू प्रश्नांचे रहस्य जाणून घेणे. ‘कलगी व तुरा’ या शब्दांचा अर्थ वेगळा वाटत असला तरी या दोन्ही शब्दांचा अर्थ ‘अलंकार’ , ‘झुबका’ पागोट्यात घालावयाचा ‘तुरा’ अलंकार.
भेदिक कवी रचनाकारांनी विश्वनिर्मितीच्या कल्पना ‘अणू-रेणू’ संबंधी या विषयापासून सामाजिक, धार्मिक विषय घेऊन कवन लिहिली आहेत. त्यांची बाडच्याबाड तयार झाली आहेत. या प्रचंड साहित्याचा विचार केला तर त्याची जपणूक करणे महत्वाचे आहे. आज जरी व्यवहारात त्याचा उपयोग होत नसला तरी सांस्कृतिक ठेवा म्हणून त्यांच्याकडे पहिले पाहिजे. तसेच भावी पिढीला याची ओळख राहिली पाहिजे. राष्ट्रीय शाहिरांनी भेदिक कवनांचा जरी अभ्यास नाही केला तरी भेदिक गायन प्रकार, विविध चाली व सूर याचा अभ्यास करणे गरजेचे आहे. भेदिक शाहिरीबद्दल असो किंवा कोणताही लोककला प्रकाराकडे आपल्या ज्ञानात भर घालण्यासाठी त्याचा अभ्यास तरी केला (संगीत, गायनादी) तर तुमच्या राष्ट्रीय शाहिरीमध्ये त्याचा उपयोग करता येईल. म्हणून विविध लोककला प्रकार जाणून घ्यायला पाहिजे. भेदिक शाहिरीचे मूळ १४ व्या शतकापर्यंत जाते. या काळातील कवी वडवालसिद्ध गणेश यांच्या रचनेमध्ये भेदिक वाङ्मयाचे मूळ सापडते. तसेच सातवाहन राजा हाल श्रेष्ठ कवी होता. त्याच्याही रचनामधून अध्यात्मिक कूट प्रश्नावली दिसून येते. (गाथासप्तशती)
प्राचीन काळापासून लोककलेचा विचार केला तर असे आढळून येते लोककलेचे क्षेत्र व्यापक आहे. लोकजीवनाच्या सर्वांगात त्याचे दर्शन होते. बहुतेक लोककला ईश्वर भक्ती व धर्मांच्या अनुषंगाने तयार झाल्या आहेत. भेदिक शाहिरी परंपरा ही हिंदू ग्रंथांचा आधार घेऊन निर्माण झाली आहे. हा एक संपद्राय आहे. त्यांच्या रचनामधून पुरुष प्रकृतीच्या संवाद म्हणजे शिवशक्ती श्रेष्ठतावाद या मायावाद व ब्रम्हवादातून विश्वनिर्मितीचे कोडे उलघडण्याचा प्रयत्न केला आहे.
या परंपरेमध्ये तुरा म्हणजे पुरुष : ब्रम्ह, शिव असे म्हटले जाते कलगी म्हणजे प्रकृती : पार्वती, शक्ती, माया, स्त्री या विश्वामध्ये यापैकी कोण श्रेष्ठ आहे. कोणी आधी जन्मले व विश्व निर्माण केले. अशा कूट प्रश्नावर आधारित रचनाकारांनी प्रचंड कवने लिहिली. एक एक कविता दीड तासापर्यंत शाहीर गाऊन त्यातून प्रतिपक्षाला प्रश्नांची खैरात करतो. पुढे विरोधी पक्षातील शाहीर त्याचे याच पद्धतीने उत्तर देतो. उत्तर देत असताना प्रतिप्रश्न गायनातून टाकत असतो. कलगी पक्षाचे शाहीर माया श्रेष्ठाविषयी गातात. तुरा पक्षाचे ब्रम्ह श्रेष्ठत्वाचा दावा करतात. यातून प्राचीन ग्रंथाचे महत्त्व आणि प्राचीन कथा लोकांना समजतात व लोकरंजनही होते. पूर्वी भेदिक बाऱ्या मोठ्या प्रमाणात चालत होत्या.
कलगीवाले म्हणतात आदिशक्तीमुळे शिवाची उत्पती झाली. तर तुरेवाले म्हणतात पुरुषानेच प्रकृती निर्माण झाली. शेवटी पुरुष प्रकृतीच्या क्रिडावृत्तीतून विश्वाची निर्मिती झाली असेही म्हटले जाते. कलगीवाले म्हणतात जगताची उत्पत्ती ही शक्तीचे फलित आहे. तसेच तिच्याचं साहाय्याने शिव कर्मरत होतो. हे विश्व प्रकृतीपासून रज, तम, सत्व यांच्या अनंत प्रकारच्या समन्वयातून सिद्ध झालेली बहुरंगी रूप आहे . मात्र तुरा पक्षाला हे मान्य नाही. मात्र काही कवींनी माया, ब्रम्ह एकच आहे असा दावा केला आहे. कवी रामचंद्र म्हणतात....
माया थोर का ब्रम्ह थोर तुम्ही ऐका तयाचा सिद्धांत !
महान महान साधू संत बोलिले व्यासादि शुक्र वेदांत !!
नेति नेति बोलिल्या श्रुती त्या अनाम शाश्वत अधमी !
हेच मूळ तत्वाचे जन्मले शिव आणि शक्तीच्या ठायी !!
जीव बोलतो जीव चालतो शक्तीकडून जीव कामकरी !!
चलन वलन हा त्याच शक्तीच्या जीव तयावरी अधिकारी !
होता सद्गुरूची कृपा पहावे आत्मबोधांत !
कवी रामचंद्र म्हणे लाग काय शिव शक्तीच्या वादात !!
कलगीचे श्रेष्ठत्व सांगणारे कवी हैबतीने ही हा वाद वाढवयाचा नाही असे सांगितले आहे. हा लोककला प्रकार महाराष्ट्राबरोबर कर्नाटक, माळवा, मध्य प्रदेशात थोड्या फार प्रमाणात गायला जातो. शक्तीवाले आपले श्रेष्ठत्व सिद्ध करताना म्हणतात..
अधऊर्ध्व शून्य चतूर महाशुन्यातून ! शून्यामध्ये निजले नारायण !
निरंजनाच्या इच्छेने शक्ती झाली उत्पन्न ! हे तुरेवाल्यांना मान्य नाही. ते म्हणतात..
शिवविण काय करील शक्ती ! जीवविण काय करील कुडी !
दीपावाचून प्रभा पडेना ! भावाविण आंधळी भक्ती !
ज्ञानातून मुक्ती मिळेना ! निष्फळ अर्थविणा पोथी !
यामध्ये पुरुषाचे श्रेष्ठत्व सिद्ध होते. कलगी आणि तुरा दोन्ही शब्द प्रतिकात्मक आहेत. बिदरच्या अल्लाउद्दीन बादशहाने सन १४४१ मध्ये शाहीर त्रिमलदास यांच्या गायनावर खुश होऊन त्याला ‘कलगी’ हे भूषण दिले होते. तसेच डफावर लावणेसाठी त्रिशूल व निशाण दिले होते. पुढे सन १५४५ मध्ये निजाम बुऱ्हामोद्दिन शाहीर अमीनदास यांना त्यांची गायकी ऐकून ‘तुरा’ बक्षीस दिल्याचा उल्लेख आहे.
कलगी शब्दाची उत्पत्ती : काली म्हणजे शक्ती > कालीचे गीत > काली गीत त्यातून कालीगी > कलगी शब्द निर्माण झाला असावा. तुरा शब्दाबद्दल तर्कसंगती अशी आहे : शिव म्हणजे हर > हराचे गीत > हरागी > तुरागी वरून तुरा शब्द तयार झाला असावा. डॉ. रां. चि. ढेरे म्हणतात कलगी – तुऱ्याचा संबंध केरळमधील ‘तर्रापट्टम’ या नाट्य प्रकाराशी संबधित आहे. ‘तर्रा’ हा शब्द वीर स्मारकाशी संबधीत आहे. वीरस्मारके दगडाची असतात. कन्नड भाषेत दगडाला ‘कल्लगे’ – ‘कळगे’ असे म्हणतात. म्हणजे ‘तर्रा’ – ‘कल्लगे’ पासून तुरा- कलगी शब्द तयार झाले असावेत. कलग तुऱ्याची गायन पद्धत महाराष्ट्रापेक्षा कर्नाटकात प्राचीन आहे. कर्नाटकात भेदिक फडामध्ये स्त्रिया देखील गायन करतात. ही तर्कसंगती आहे. मात्र उत्तर समाधानकारक नाही. लीळाचरित्रामध्ये ‘दफगाणे’ असा उल्लेख आहे. म्हणजे कलगी- तुरा नाव प्राप्त होण्याऐवजी ‘दफगाणे’ हे नाव होते. भेदीकचा हा प्राचीन काळापासून शिव काळापर्यंत प्रवास असला तरी उत्तर पेशवाईत भेदिकला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. यावेळी महाराष्ट्रात ‘दशावतार’ गोंधळ व अध्यात्माचे स्थूल भेद उलघडणारे भेदिक शाहिरांचे ताफे होते. शाहीर हा शब्द देखील उर्दू ‘शायर’ या शब्दापासून मराठीत आला आहे. या काळात भेदिक शाहीर कवींनी अध्यात्मा बरोबर शूरांच्या कथा रचायला सुरवात केल्या . त्याचवेळी सैन्यांच्या तळामध्ये काही कलावंत शृंगारिक गाणी गाऊन दाखवत होती. त्यातून मराठी तमाशाची जन्मदात्री ‘लावणी’ ची सुरुवात झाली व भेदिक शाहीर लावणी लिहून लागले. कवी परशुरामाने ‘भाताच्या रोप लावणी’ प्रमाणे तमाशाच्या लावणीबद्दल म्हणतात ‘करीन लावणी अक्षर वेचुनी ! देवा पंढरीनाथा’ !! म्हणजे शृंगारिक शब्दांची एकापुढे एक केलेली लावण म्हणजे लावणी अशा शृंगारिक लावण्या शाहीर फडामध्ये एक तुणतुण्याच्या तालावर गाऊन दाखवत असत. त्या काळात काही कलावंतीण स्त्रिया दिवाणखाण्यात बसून तबला व सारंगीच्या तालावर लावण्या म्हणत. त्यामध्ये भक्ती व नीती हा विषय असे. पुढे दलित, कोल्हाटी, महार, मांग कलावंतानी दफाऐवजी ढोलकी, टाळ (झांज), तुणतुणे या वाद्द्यांचा वापर केला. त्यासाठी साथीदार (सुरत्ये) असत, ते भेदिक ढंगातच गात असत. त्या गायन प्रकारास ‘म्हारकी’ चालीची लावणी म्हणतात. तमाशात शाहीर असावा लागतो. त्याला व सुरत्याना भेदिकीचा अभ्यास असावा लागतो. या भेदिक प्रकारातून तमाशाला चालना मिळत गेली. पेशवाईत रामजोशी, परशुराम, होनाजी आणि बाळा , समनभाऊ, प्रभाकर, अनंत फंदी हे शाहीर होऊन गेले. त्यांना राजाश्रय प्राप्त होता. त्यांच्या असंख्य रचना त्यामध्ये भेदिक कवने, लावण्या, कटाव, फटके इत्यादी आहेत. तमाशाचा गाभा ‘वग’ मात्र या काळात तयार झाला नाही.
कवी हैबती , पुसेसावळी (सातारा) कर्मभूमी गुरु गोपाळनाथ, केवल्यनाथ (नाथनिरंजन कृपाप्रसादे) यांचे कृपेने असंख्य रचना, वेदशास्त्र, गणित शास्त्र, खगोल शास्त्र, ज्योतिषशास्त्र, संगीतशास्त्र, वास्तू विज्ञान, पदार्थ विज्ञान , रसायनशास्त्र अशा विविध शास्त्रांवर रचना केल्या आहेत. पहिला शिष्य शंभु (आण्णा) साळी,भिलवडी (जिल्हा सांगली) काही काळ एकत्र वास्तव्य केल्यानंतर शंभू आण्णा गुरु हैबतीला सोडून निघून गेला व स्वतंत्र विरोधी (पुरुष श्रेष्ठत्वाचा) रचना तयार करू लागला. त्यावेळी त्याचा मित्र राजू तांबोळी (मुसलमान) याची साथ मिळाली. तुरा पक्षाच्या असंख्य रचना तयार झाल्या. संभू आण्णा दुसरा गुरु मनेराजुरीचा रामा नरु व त्यांचे गुरु तासगावचे बाबाजी पाटील अशीही त्यांची दुसरी गुरु शिष्य परंपरा आहे. कवी हैबती बुवाने शंभू आण्णास शाप दिल्याची आख्यायिका आहे. तू कधीही यशस्वी होणार नाहीस. कलगी पक्षाचे शाहीरच भेदिक बारीला सुरुवात करतात नंतर तुरा पक्षाच्या शाहिराने गावयास सुरुवात करावयाची असते. हैबती व शंभू आण्णांच्या विभक्त होण्याने कलगी तुऱ्याच्या श्रेष्ठत्वाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे. आपणास गुरु शिष्याचा वैचारिक संघर्ष पहावयास मिळतो. भेदिक कवनाथ सांकेतिक कूट शब्दांचा वापर केला जातो.
१) मूळ प्रकृती – आदीमाया, २) तीन तत्वे – मन, बुद्धी, अहंकार ३) तीन देह- स्थूल, सूक्ष्म, कारण ४)तीन नाड्या – इडा, पिंगला, सुषुम्ना ५) औटपीट – श्रीहाट, गोल्हाट, लल्हाट ६)औटमातृका – आकार, उकार, मकार, अर्धा ओंकार ७) चार शून्य- अर्थ, ऊर्ध्व, मध्य, नि:शुन्य
कवी हैबतीच्या रचना : एक अचंबा असे दिसाचे चंद्र पाहिले चार, चारी चंद्र सारखे सारखा नामाचा उच्चार चार चंद्र कोणते तयाचा करा मनी विचार ! आहे सत्य नव्हे असत्य, वाल्मिकी मुनीचे कृत्य ! कथिले भविष्य स्वतःचे !
कवी दिगंबर : निर्गनातून आला बहुरुपी चमत्कार केला ! एका वर्णांमध्ये सहस्त्र वर्ण दाखविले मजला ! सहा वाघांचे चर्म काढुनी उभे स्वामीवर्त ! कामक्रोधाची धूनी लावली प्रकटली ज्योत ! सहा जणांचे शीर कापूनी प्याले त्यांचे रक्त ! त्याच शिरावर ज्योत ठेवली प्रकाश दुनियेत ! पाच पदराची झोळी करुनी गेले नगरात ! ‘भिक्षा वाढ माय’ म्हणून उभे दरवाजात ! वसाड नगरीत होती कन्या आली वाढण्याला ! त्या मुलीने भिक्षा वाढली बहुरूपी शांत झाला ! भिक्षा घेऊनी त्या मुलीला आशीर्वाद दिला ! न्हाव येण्या आधी आठरा मुले होतील तुला ! सहा होतील नित्य जातीचे, जातील चोरीला तीन ! होतील दुष्ट दुर्जन त्रास दुसऱ्याला ! ब्रम्हहत्या , गोंहत्या, स्त्रीहत्या, घडेल तिघाला ! आणि होतील नपुसंक चार तिच्या उदरात ! एका मुलाला वेड लागेल जाईल न्हाई तिथे ! आणखी पाच कन्या मोठ्या अदभूत ! नपुसंकाबरोबर लग्न करतील विस्तार दुनियेत ! मुकी मुले चार होतील पाचीच्या उदरात ! जो जाणील याचा अर्थ तोच साधू संत !
कवी दिंगबराचा अनाकलनीय अशी अध्यात्मिक रचना आहे. सहा वाघ म्हणजे सहा षडरिपू, पाच पदराची झोळी म्हणजे पंचप्राण, वसाडनगरीची कन्या म्हणजे माया, आठरा मुले म्हणजे अठरा पुराणे असे सांकेतिक शब्द असतात.
कवी हैबतीची रामायणातील एक रचना आहे. दहात बसावे, दहात उठावे, गोष्ट बोलावी खरी ! बीन बापाचा पुत्र जन्माचा, आईबी नव्हती घरी ! हि कथा रामायणातील लव जन्माची आहे. प्रभू रामचंद्रांनी रावणाचा नाश करून सीतेची सुटका केल्यानंतर काही दिवस संसार केला. त्यानंतर काही कारणानुसार सीतेला गरोदर असताना पुन्हा जंगलात पाठविले त्यावेळी ती वाल्मीकी महर्षींच्या आश्रमात राहत असताना तिला एक मुलगा झाला. त्याचे नाव कुश ठेविले. एकदा वाल्मिकी महर्षी जंगलात गेल्यानंतर सीतेने आपल्या मुलग्यास पाळण्यात न ठेवता आपल्या बरोबर घेऊन नदीवर पाणी आणण्यासाठी गेली होती तेवढ्यात वाल्मिकी महर्षी आश्रमात आले तोच पाळण्यात मुलगा दिसत नाही. त्यामुळे वाल्मिकी ऋषी घाबरले. कदाचित सीतेचा मुलगा जंगली पशूंनी खाल्ला कि काय ? ती आल्यावर आक्रोश करेल म्हणून त्यांनी पाळण्यात दर्भांकुरांचे अभिमंत्रण करून एक सजीव बालक पाळण्यात निर्माण केले. त्याचे नाव ‘लव’ ठेवले. अशा कथांवर रचनाकारांनी रचना तयार करून कूट प्रश्न निर्माण केले आहेत.
धन्यवाद
लेखकांविषयी –
प्रा. आनंद गिरी (आपटी , पन्हाळा )
(माजी इतिहास विभागप्रमुख, श्री. शहाजी छ. महाविद्यालय, कोल्हापूर)
इतिहास व लोकसंस्कृतीचे अभ्यासक व संशोधक .
विविध वर्तमानपत्रे, नितकालिक यांमधून लेखन तसेच काही पुस्तके प्रकाशित
सुरभी संस्थेच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रात सांस्कृतिक चळवळ
बारा बलुतेदार, कवी शंकरराव व भेदिक शाहिरी, लोकसंस्कृतीचे उपासक, महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला ही पुस्तके प्रकाशनाच्या वाटेवर
या विषयी अधिक माहिती जाणून घेण्यासाठी “महाराष्ट्राची लोकधारा : भेदीक शाहिरी (कलगीतुरा)” हे प्रा. आनंद गिरी लिखित अक्षरदीप प्रकाशनाने प्रकशित केलेले पुस्तक नक्की वाचा. आजचा लेख कसा वाटला नक्की कमेंट करा. आणि हो फॉलो आणि शेअर करायला विसरू नका.
1 टिप्पण्या
स्वराज्य काळापासून महाराष्ट्रात शाहीरी वाङमयाची लोकप्रियता होती.
उत्तर द्याहटवाशाहीरांनी रचलेल्या पोवाडे व लावणी या काव्याला अस्सल मराठमोळी काव्य म्हणून पाहिले जाते
शाहीरांच्या फडात लावणी गाजली. तिने जनसामान्यांची हृदये काबिज केली
सर, आपण कलगी-तुरा यावर छान लिहिले आहे. पुस्तकाची उत्सुकता आहे.
विवेकानंद काॅलेज, कोल्हापूर येथे प्रत पाठवून द्या. आपली ग्र॔थ रक्कम कशी पोच करायची ते सांगा. आपला पत्ता पाठवला तर कोल्हापूरात असाल तर लगेच ग्रंथ घेता येईल
प्रा.भाऊसाहेब गोसावी
मराठी विभागप्रमुख
विवेकानंद कॉलेज कोल्हापूर
9423270947