भटकंती स्वराज्यतीर्थ रायरेश्वराची अर्थात रायरेश्वरवारी !

Follow us on Facebook

भटकंती स्वराज्यतीर्थ रायरेश्वराची अर्थात रायरेश्वरवारी !

    भटकंती स्वराज्यतीर्थ रायरेश्वराची अर्थात रायरेश्वरवारी !

    पावसाळा म्हणजे सह्याद्रीसाठी आनंदाचा सोहळाच ! या ऋतुत सह्यमाळा चांगल्या सजतात. नेहमी शेतात राबणाऱ्या कष्टकारी महिलेप्रमाने रापलेल्या डोंगरदेवता भरजारी हिरवे लुगडे नेसतात. त्यावर लहानमोठ्या धबधब्याची नक्षी-बुट्टी असते. ठेंगणे झालेले आभाळ  डोंगरमाथ्याभोवती बागडत राहते. जलधारा सतत बरसत असतात व निसर्गातला ऊष्मा धुवून काढतात... ऐकुनच सारे प्रसन्न वातावरण ! 

   असे नितळ सह्यसौंदर्य अनुभवण्यासाठी आम्ही रायरेश्वरवारीचे नियोजन केले. यावेळी नेहमीच्या भटक्या मित्रांमधले फ़क्त चार जन होतो. भोरमधे पोहचायला बराच उशीर झाला. दुपार टळून गेलेली. सूर्यदेव मात्र पावसाळी ढगांच्या आड विश्रांति घेत होते. भोर मधे नाष्टापाणी उरकुन महाराजांच्या मूर्तीस प्रणाम केला व रायरेश्वराच्या दिशेने रवाना झालो. रस्ता पुढे सरकत होता तसे शहरीकरण विरळ होत गेले. गाडीमार्ग सह्याद्रीच्या कुशीत शिरला. अस्सल मावळी गावे व शुद्ध निसर्गाच्या कुशीतला सुखावनारा प्रवास सुरू झाला. थोडासा त्रासदायक वाटत होता तो सतत कोसळनारा पाऊस. मात्र त्याचीही सवय होऊन गेली. या प्रवासदरम्यान गावे कमी अन् भाताची खाचरेंच जास्त दिसत होती. पातेल्यातून चहा वतु जावा तसे खाचरातून ताम्बडेभडक पाणी भरून वाहत होते. जलअमृत पिऊन तृप्त झालेली धरणीमाय आता त्याच पावसात मनसोक्त नाहात होती. एका बाजूला रोहिडागडाचे ताशिव कडे खुनावत होतेमात्र त्यांना लाम्बुनच नमन करून सरळ निघालो. चहुबाजूची सह्यसृष्टि पाहाताना ना मान दुखत होती ना नेत्र थकत होते.  डोंगरझाडीत लपलेली वेनवडी-शिरवली-आंबेघर--नाटंबी-पानव्हळ-नाझरे-अंबावडे-टिटेघर-ओहळी अशी गावे पार करत रायरेश्वर पायथ्याला पोचलो. पुढचा प्रवास घाटातून होता. त्याच डोंगररांगेतला केंजळगड धुक्यांच्या जटा सावरत साद घालत होतामात्र निसर्गाचा रौद्रअवतार पाहुन तिथे पोहचने अशक्य आहे हे लक्षात आले. निसरड्या वळणवाटाधुक्यांची दाटीसुईप्रमाने टोचनारे पाऊसथेम्बबोचरी थंडी अश्या मरणयातना सोसत घाट पार केला. मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही म्हणतातम्हणजे मेल्यावर स्वर्ग दिसायलाच हवा ना ! 😀 ... हो! वरून दिसनारे अजुबाजूचे डोंगर व डोंगररहाळातले नयनरम्य दृश्य स्वर्गापेक्षा कमी नव्हते. रहाळात सपाटिवर अधेमधे एखादे घर अथवा वस्तिकुठेतरी भातलागवड झालेली खाचरे बाकी नुसते पाणीच पाणी. हिरव्याकंच डोंगरांच्या सौन्दर्याचे तर वर्णनच करता येणार नाही ! अंगाखांद्यावर असंख्य धबधबे घेऊनधुक्याचा फेटा गुंडाळुन अवघ्या मुलुखाचा साज न्याहाळत डौलात बसलेले...

 वर पोहचताच आस लागली ती रायरेश्वराच्या दर्शनाची. थोडी पायपिट करुणथोडा अवघड शिडीमार्ग चढुन डोंगरमाथा गाठला. शिड्यांवरून चढताना अधेमधे दगडात कोरलेल्या पायऱ्या दिसल्या. पूर्वी शिड्या नसताना नुसत्या कातळपायऱ्यांवरून कसा प्रवास होत असेल या अवघड कल्पनेनेच अंगावर शहारा आला. वर मंदिरापर्यन्त जाण्यासाठी एक-दिड किमी चालावे लागतेमात्र अजुबाजूस बहरलेला निसर्ग असल्याने प्रवासाचे कष्ट जानवत नाहित. वाटेत तलाव दिसतो तसेच एक बारकुसा ओढा शेवटपर्यंत साथ देतो. मंदिराजवळ चिरेबन्दी टाके आहे. त्यात गोमुख पाहायला मिळते. बाकी परिसर अतिसुंदर. एकीकडे शुभ्र फेसाळता जलप्रवाहगच्चहिरव्या टेकड्यास्निग्ध धुक्यांची धावपळ यांच्या प्रभावळीत मंदिर अगदी शोभून दिसते. तसे हे शिवालय अतिशय लहान पण स्वराज्याचे उगमस्थान म्हणून अद्वितीय. मंदिराच्या सभामंडपात तीन नंदी आहेत. पुढे प्राचीन सभामंडपात  दगडी खांब आहेत. गर्भगृहाच्या प्रवेशद्वारावर शेन्दराने माखलेले बाप्पा विराजमान आहेत. गाभाऱ्यामधे नुस्ता अंधार. मंद तेवनारी समई. याच मंद प्रकाशात उजळलेले शिवलिंग व मागच्या भिंतीवर शिवराय स्वराज्यस्थापनेची शपथ घेत आहेतया आशयाचे चित्र. एकूणच भारावुन टाकनारे वातावरण ! शिवपिंडीवर माथा टेकताच मन गहिवरले व इतिहासात विरुन गेले... काय घडले असेल 'त्यादिवशी ?...चार-दोन जानती मंडळीदहा-विस किंवा थोडी जास्त पोरेसोरे... जातपातवय वगैरे भेद विसरून एकत्र जमलेली... या सर्वांचा राजा पोरासोरांच्याच वयाचा पण बुद्धिने जानत्याहुन जानता. त्याच्या मनात जिजाऊमाँसाहेबांचे संस्कार होते तर डोक्यात शहाजीराजेंचे स्वराज्यस्थापनेचे अपुरे स्वप्न. खरं तर हे अवघ्या रयतेचे स्वप्नपण पातशाही मुलुखात स्वप्नातही असा विचार करता येत नसे. शिवरायांनी मात्र रायरेश्वराला साक्षी ठेऊन स्वराज्यस्थापनेची शपथ घेतली. शिवपिंडीवर आसुद अर्पित स्वराज्याच्या अग्निकुंडात ठिनगी टाकली... हर हर महादेवचे जयघोष घुमले. सह्याद्री आनंदलामहाराष्ट्र हर्षित झाला. स्वातंत्र्याची पहाट झाली होती... पुढचे शिवभारत सर्वांनाच ज्ञात आहे.


     आम्हाला त्या ऐतिहासिक शिवपिंडीसोबत छायाचित्रे काढण्याचा मोह आवरला असता तर नवलंच ! पण शिवलिंगावर नतमस्तक होताना अनेक विचार मनी दाटले. शिवरायांच्या रक्ताने पावन झालेल्या त्या निराकार मूर्तीला स्पर्ष करण्याची आपली लायकी आहे काय खरच आपण तितके पवित्र आहोत काय शिवपिंडिवर झुकलो खरा पण शिवलिंगास स्पर्ष करण्याची हिम्मत झाली नाही. अखेर ध्येयमंत्र-प्रेरणामंत्र म्हणून जड मनाने मंदिराबाहेर आलो. समोरील देवीच्या मंदिरात जाउन आदिशक्तीचे दर्शन घेतले व काही क्षण विसावलो. मंदिराजवळ अज्ञात वीरांच्या समाधीशिळा होत्या. त्याही निरखल्या.भटकंती स्वराज्यतीर्थ रायरेश्वराची अर्थात रायरेश्वरवारी !


 इथेच रायरेश्वर दर्शन संपन्न झाले. संपूर्ण पठार धुक्यात लपले असल्याने जास्त फिरता आले नाही. पण नंतर केव्हातरी केंजळगड-रायरेश्वर दोन्ही पाहू अशी स्वप्ने रंगवत घरी रवाना झालो. मन मात्र रायरेश्वरीच होते... इतिहासात हरवलेले !!!

                                                                - सुजय खलाटे.

(प्रस्तुत ब्लॉग चे लेखक You tube चॅनेल देखील चालवतात. इतिहास-दुर्ग-परंपरा-धर्म यांबद्दल जाणून घेण्यासाठी पुढील लिंक वरील  You tube "Dakhkhan Desh (दख्खन देश)" चॅनेल नक्की Subscribe करा.  https://www.youtube.com/channel/UCOtzTNDgB2rsk1Z7AAFPErg )

रायरेश्वर व केंजळगड सोबत आपण वाई भोर परिसराची भटकंती करू शकतो. या परिसरात आणखी काही किल्ले, मंदिरे व इतिहासप्रसिध्द ठिकाण आहेत.

कमळगड :

        वाईपासून अवघ्या २९ किलोमीटर अंतरावर कमळगड आहे. रायरेश्वर व केंजळगड पाहून आपण धोम जलाशयाला वळसा घालून गडाच्या पायथ्याचा तुपेवाडी या गावी येऊ शकतो. येथून गड तासाभरात सर करता येतो. गडाच्या वाटेत एक छोटेखानी मंदिर आहे. गडाच्या माचीवर जणू काही गडाची राखण करत असलेले एकमेव धनगराचे घर आहे. तेथून काही अंतरावर घनदाट जंगलात पडक्या तटबंधीला ओलांडून गडाच्या माथ्यावर छोट्याश्या लोखंडी शिडीद्वारे येतो. गडाचा माथा अगदी आटोपशीर आहे. गडावर एक खोल कावेची विहीर आहे. हि विहीर पंचक्रोशीत खूप प्रसिध्द आहे. या व्यतिरिक्त मोठ्या प्रमाणावर बांधकामाचे अवशेष सापडत नाहीत.  गडाच्या माथ्यावरून धोम जलशय, महाबळेश्वर परिसर खूप सुंदर दिसतो. दूरवर केंजळगड व रायरेश्वर पठार लक्ष वेधून घेतो. गडावरून महाबळेश्वरला पायवाटेने जाता येते.        

वैराटगड :

       प्राचीन वाई शहराच्या उत्तर आणि दक्षिण दिशेला वैराटगड व पांडवगड हे दोन दुर्ग आहेत. वाईपासून वैराटगड ८ किलोमीटर अंतरावर आहे. हा हि गड तसा आकाराने लहान आहे. गडावर पाण्याच्या टाक्या, छोटीमंदिरे पाहण्यासारखी आहेत. या गडाच्या बांधणीचे श्रेय कोल्हापूरचा राजा शिलाहार भोज याला दिले जाते. हा गड वाई सुभ्यात येतो. १८१८ मध्ये हा गड इंग्रजांनी जिंकून घेतला.

पांडवगड :

       मेणवली गावातून पांडवगडावर जाता येते. गडावर अनेक ऐतिहासिक वास्तू आपणास पहावयास मिळतात. पाण्याची टाकी, मोठमोठी तळी, तटबंदी, दरवाजाचे अवशेष , मंदिर आदी वास्तू गडावर तग धरून आहेत. या गडावरून वैराटगड, कमळगड, कैंजळगड, मांडरदेव , वाई , मेणवली आदी परिसराचे विलोभनीय दृश्य दिसते.   

       

वाई :

    वाई शहराला दक्षिण काशी म्हणून ओळखले जाते. येथे विविध धार्मिक खटले सोडवले गेले. साहित्य चळवळ या शहराने उभी केली. मराठी विश्वकोशाची निर्मिती या ठिकाणी सुरु झाली. आजही हे कार्य अविरत सुरु आहे. मराठी विश्वकोशाचे मुख्यालय वाई मध्ये आहे. शहरात विविध जुने वाडे आजही आपणास पहावयास मिळतात. कृष्णेकाठी घाटावर असलेला ढोल्या गणपतीची छत्रछाया या नगरीवर आहे. ह्या गणपतीचे दर्शन घेऊन आपण मेणवली येथील पेशवेकाळातील  मुत्सदी फडणीसांचा वाडा पहावा. तसेच या परिसरातील प्रसिद्ध मांडरदेवीचेही न चुकता दर्शन घ्यावे.

रोहीडा उर्फ विचित्रगड :

         रोहीडा किल्ला बिनीचा किल्ला म्हणून देखील ओळखला जातो. गडाच्या पायथ्याच्या बाजारवाडी या गावातून गडावर जाता येते. गडावर अनेक बुरुज, दरवाजे, तटबंदी, पाण्याची टाकी सुस्थितीत आहेत. पुरंदरच्या तहात हा गड मोघलांच्या ताब्यात होता तो परत छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला. भोरच्या पंतसचिवाकडे हा गड अखेरपर्यंत इतर किल्ल्याप्रमाणे होता.    

            

भोर परिसर :

     भोर चे संस्थानाधिपती श्री. पंतसचीव यांचा भोर चा वाडा पाहण्यासारखा आहे. तो या भटकंतीमध्ये न चुकता पहावा . हा वाडा पाहून रायरेश्वराला प्रस्थान करावे. वाटेत आपल्याला शिवकालीन आंबवडे गाव लागते. या गावातील नागेश्वर मंदिर , कान्होजी जेधे व जिवाजी महाले यांची समाधीस्थळे पहावी. ओढ्यावरील लोखंडी झुलता पूल पाहून येथून जवळच असलेले कारीमधील जेधे यांचा वाडा पहावा.   

भटकंतीची मार्ग : भोर (पंतसचिव वाडा) रोहीडा भोर आंबवडे कारी रायरेश्वर केंजळगड कमळगड वाई मेणवली पांडवगड मांडरदेवी वाई वैराटगड    

                 माहिती संकलन- टीम parnal.in

(आजचा लेख कसा वाटला ? तुम्ही हा ट्रेक केला असेल तरतुमचे लाईक करा ,शेअर करा आणि फॉलो करायला विसरू नका. )

                                           - धन्यवाद -


टिप्पणी पोस्ट करा

3 टिप्पण्या

  1. खूप छान ट्रेक आहे आणि तुझ्या बरोबर ट्रेक हा ट्रेक आठवणीत राहिला

    उत्तर द्याहटवा
  2. मानसिंग पाटील सर तुम्ही विजय पाटील व अंकुश तेलंगे सर यांच्यासोबत चा हा ट्रेक अप्रतिम झाला.

    उत्तर द्याहटवा
  3. Mi mazablog.online navachi website chalvat aahe. Tithe tumchi post takaychi asel tr kalva. 7020965224

    उत्तर द्याहटवा