“महाराष्ट्राची लोकधारा : भेदिक शाहिरी (कलगीतुरा)” कलगीतुऱ्याच्या भेदिक शाहिरीचा यथायोग्य परिचय !

Follow us on Facebook

“महाराष्ट्राची लोकधारा : भेदिक शाहिरी (कलगीतुरा)” कलगीतुऱ्याच्या भेदिक शाहिरीचा यथायोग्य परिचय !

“महाराष्ट्राची लोकधारा : भेदिक शाहिरी (कलगीतुरा)” कलगीतुऱ्याच्या भेदिक शाहिरीचा यथायोग्य परिचय !

-    डॉ. रविंद्र ठाकूर


     शाहिरी साहित्याचा फार मोठा भाग कलगीतुऱ्याच्या आध्यात्मिक शाहिरीने व्यापलेला आहे. महाराष्ट्रीय समाजाला वीररसप्रधान पोवाडे जेवढे प्रिय होते तेवढीच अध्यात्मिक शाहिरीही प्रिय होती.तिलाच भेदिक शाहिरी म्हटले जाते. पुरातन काळापासून सुरु असलेली हि भेदिक शाहिरी परंपरा आजही टिकून आह. या शाहिरीचा यथायोग्य असा परिचय प्रा. आनंद गिरी यांनी त्यांच्या “महाराष्ट्राची लोकधारा : भेदिक शाहिरी (कलगीतुरा)” या ग्रंथात करून दिला आहे. या शाहिरीला आणि ती शाहिरी सादर करणाऱ्या कलावंताला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी त्यांनी ‘सुरभी’ हि लोककला संघटना स्थापन केली असून अनेक कलावंतांना रंगमंच उपलब्ध करून दिला आहे.

      या ग्रंथाच्या परिचयाकडे वळण्यापूर्वी प्रथम कलगीतुरा म्हणजे काय हे लक्षात घेतले पाहिजे. कलगीतुराच्या अध्यात्माला शिवशक्ती विचारांचा पाया आहे. मुळात शिव हे निर्गुण तत्त्व असून माया हे त्याचे दृश्य रूप होय. जागृती स्वप्न आणि सुषुप्ती या पलीकडच्या तुर्यावस्थेत जीवाला शिवततत्वाचे ज्ञान होऊ शकते. तुर्यावस्थेत ज्याचे ज्ञान होते त्या शिवतत्त्वाची आराधना प्रधान मानणारा तो तुरा पक्ष होय. तर कलगी पक्ष शक्ती तत्त्वालाच सर्व जगाचे मुलतत्व मानतो. कारण निर्गुण शिवतत्व हे शक्तीशिवाय निर्मिती करू शकत नाही. जग आणि मनुष्यदेह हि मायेच्या सोळा कलांची रूपे आहेत. परंतु महत्त्वाची आहे ती सतरावी ज्ञानकला म्हणजेच जीवनकला. शक्ती तत्त्वामुळे प्रकटनाऱ्या या सतराव्या ज्ञानकलेची उपासना महत्वाची मानणारा तो कलगी पक्ष होय.

      वस्तुतः दोघांनाही शिवशक्ती तत्त्वातील अभेद मान्यच आहे. वाद आहे तो महत्त्व कोणाला घ्यावयाचे यावरून. निदान कलगीतुऱ्याच्या शाहीरीतला वाद तरी एवढाच दिसतो. शिवतत्त्व अव्यक्त असल्याने कलगी पक्ष सगुण शक्तीतत्त्वाची उपासना महत्त्वाची मानतो आणि तुरा पक्ष मायेला नाशिवंत मानून निर्गुण शिवतत्वाची आराधना श्रेष्ठ मानतो. या तत्वज्ञानातील तुर्यावस्था आणि सतरावी कला हे शब्द महत्त्वाचे आहेत. त्यावरून कलगीतुरा हे शब्द संक्षेपाने तयार झाले असावेत असे वाटले. तसेच हेही शक्य आहे की, कलगीतुरा हे शब्द मुळच्या भेदिक कवनांना सवालजबाबांचे रूप प्राप्त होत गेले तसे काळाच्या ओघात तयार होत गेले असावेत. तत्वज्ञानातील मतभेदांवरून दोन पक्ष पडल्यामुळे त्यांना हि नावे पडली असावीत. एकंदरीत कलगीतुराच्या अध्यात्मात काश्मिरी शैव मत, मुस्लीम सुफी संपद्राय आणि वारकरी संप्रदायाचे तत्वज्ञान यांचा मिलाफ झाला आहे. तथापि त्याचा पाया हिंदू तत्वज्ञान हाच आहे.

     पेशवे काळातील अनेक शाहीर कलगीतुऱ्याचा निमित्ताने झालेल्या सवालजबाबाच्या आखाड्यातून पुढे आले.  होनाजीबाळा, परशुराम, रामजोशी हे शाहीर तुरेवाले म्हणून प्रसिद्ध होते तर सगनभाऊ, हैबती हे कलगीवाले म्हणून प्रसिद्ध होते. शाहीर हैबती यास कलगीसम्राट असे म्हणतात. इंग्रजी अमदानीत उदयास आलेला थोर तमासगीर शाहीर पठ्ठे बापूराव हाही कलगीवाला म्हणूनच प्रसिध्द होता. अशाच एका सवालजबाबात त्याने पवळा या सुस्वरूप आणि गानकुशल तमासगीर स्त्रीला जिंकले होते.

     सदर ग्रंथात प्रा. गिरी यांनी भेदिक शाहिरी परंपरेचा आणि तिच्या इतिहासाचा विस्तृत मागोवा घेतला असून विशेषतः शाहीर हैबती त्यांचा शिष्य संभू राजू उर्फ संभू अण्णा कोष्टी, शंकरनाथ महाराज, अमृता कारंडे, कवी पठ्ठे बापूराव, कवी बालनाथ, कवी सदानंद, कवी सदालाल, कवी नाना विठ्ठल अशा अनेक शाहिरांचा आणि त्यांच्या शाहिरीचा उत्तम परिचय करून दिलेला आहे. शाहीर हैबती, शंकरनाथ, पठ्ठे बापूराव हे कलगी पक्षाचे प्रमुख शाहीर आहेत तर शंभू राजू हा मुळात हैबती यांचा शिष्य असूनही पुढे तुरा पक्षात सामील झाला आहे. यातले पठ्ठेबापूराव सारखे शाहीर सोडले तर अनेकांना पुरेशी औपचारिक शिक्षणाची पार्श्वभूमी लाभलेली नाही. तथापि त्यांचा हिंदू धर्मग्रंथाचा अभ्यास इतका सखोल आहे की त्यामुळेच त्यांचे सवालजबाबाचे सामने एकमेकांच्या ज्ञानाची कसोटी घेणारी असत.

     महाराष्ट्राच्या खेड्यापाड्यांमधून ही परंपरा आजही कशी टिकून आहे हे या ग्रंथात अनेक शाहिरांच्या भेदिक शाहिरीवरून दिसून येते. या संदर्भात सर्जेराव टिपुगडे, रामचंद्र टिपुगडे, रामचंद्र जाधव, कवी बंधुसखा अशी अनेक      उल्लेखनीय ठरतात. एकंदरीत भेदिक शाहिरीचे स्वरूप जाणून घेण्यासाठी सदर ग्रंथ वाचकांना आणि साहित्य संशोधकांना निश्चितच उपयुक्त ठरेल. ग्रंथ जसा उत्तम आहे तशीच त्याची निर्मितीही अत्यंत देखणी आणि उत्तम आहे. त्यासाठी प्रकाशक वसंत खोत यांचेही अभिनंदन करावयास हवे.

“महाराष्ट्राची लोकधारा : भेदिक शाहिरी (कलगीतुरा)”

लेखक : प्रा. आनंद गिरी

प्रकाशक : अक्षरदीप प्रकाशन, कोल्हापूर

मूल्य : तीनशे रुपये

आजच्या “महाराष्ट्राची लोकधारा : भेदिक शाहिरी (कलगीतुरा)” कलगीतुऱ्याच्या भेदिक शाहिरीचा यथायोग्य परिचय ! ’’ या लेखात भेदिक शाहिरीचा इतिहास मांडणाऱ्या प्रा. आनंद गिरी लिखित “महाराष्ट्राची लोकधारा : भेदिक शाहिरी (कलगीतुरा)” या पुस्तकाविषयी जाणून घेतले. आजचा पुस्तक परिचयाचा लेख कसा वाटला ? नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर नक्की शेअर करा. आणि फॉलो करायला विसरू नका. तसेच प्रा. आंनद गिरी यांचा हा लेख जरूर वाचा .

                                            धन्यवाद !  


टिप्पणी पोस्ट करा

2 टिप्पण्या